आई जागी ठार तर मुलगा गंभीर जखमी
पंढरपूर/प्रतिनिधी;
पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मायलेकरांना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे ६.३० वाजता बोंडले (ता.माळशिरस) येथे घडली.
वेळापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत माधुरी नवनाथ देशमुख (वय ३५ वर्षे रा.विखळे जि. सातारा) या शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख (वय ११ वर्षे) याच्यासह मॉर्निंगवॉकसाठी पुणे -पंढरपूर पालखीमार्गावर गेल्या होत्या. दोघे वेळापूरच्या दिशेने चालत येत असतानाच पाठीमागून येणार्या मालवाहतूकीच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने दोघांही ट्रकखाली चिरडल्याने माधुरी देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलावर वेळापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. माधुरी नवनाथ देशमुख या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांंच्याकडे आल्या होत्या.
ट्रकचा पाठलाग करून गावातील युवकांनी त्या ट्रकचालकास माळशिरस येथे पकडले. मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक नबिसा लाडलेसाहब पटेल (वय ३५) व क्लिनर मल्लिकार्जुन भिमराव धोरे (वय ४२ रा.रामामोला शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा) या दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments