प्राथमिक आरोग्य केंद्रास औषध फवारणी पंप भेट; कोतोलीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी


कोतोली दि.०८ : कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास  ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन जमा केलेल्या पैशातून आरोग्य केंद्र वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी पंप भेट देऊन कोतोलीकरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

      प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल चव्हाण यांच्याकडे कोरोना दक्षता समितीच्यावतीने औषध फवारणी पंप सुपूर्त करण्यात आला. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सज्जन पाटील(दाजी), संदीप चौगुले,शानराव पाटील, संतोष पोवार, सरदार पाटील ,एस डी पाटील, अरुण पाटील(क्रीडा अधिकारी) अभिजीत कोतोलीकर, रवी सावत, संतोष सूर्यवंशी, मारुती पाटील,ओंकार यादव यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाफ आदी उपस्थित होते.

      कोतोली येथील कोरोना बाधित तसेच संशयित व्यक्तींना एकलव्य कोव्हीड सेंटर,संजीवनी नॉलेज सिटी,फोर्ट इंटरनॅशनल तसेच पन्हाळा पब्लिक स्कुल येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. अलगीकरणं केलेल्या व्यक्तींना गावातील नागरिकांनी लोकवर्गणीतुन जमा केलेल्या पैशातूनच चहा नाश्ता व जेवण पुरवण्यात येत होते. या लोकवर्गणीमधील उर्वरीत पैसे आरोग्य सेवेसाठी खर्च करावेत या उद्देशाने आरोग्य केंद्र वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी पंप भेट देऊन कोतोलीकरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

        पन्हाळा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून कोतोलीमधील दक्षता समितीच्यावतीने लोक वर्गणीतुन संपूर्ण खर्च करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला गावातील दानशूर,तसेच तरुण मंडळींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. जमा झालेल्या वर्गणीमधून चहा,नाश्ता व जेवण पुरवण्यात आले असून उर्वरित रक्कम देखील नागरिकांच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात येत आहे. दरम्यान कोतोली गावाने एक अनोखा उपक्रम राबवत सामाजिक संदेश दिला असून सर्व देणगीदारांचे सरपंच प्रकाश पाटील यांनी आभार मानले. 

.............
फोटो कॅप्शन: कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास  ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन जमा केलेल्या पैशातून औषध फवारणी पंप भेट देण्यात आला यावेळी सरपंच प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिकारी कुणाल चव्हाण, सज्जन पाटील यांच्यासह दक्षता समितीमधील स्वयंसेवक आदी.

Post a Comment

0 Comments