कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लोकभारती पक्षाचे निवेदन

 काम बंद पाडण्याचा ईशारा 

कोतोली(१४): कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच कमी दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून ठेकेदाराकडून शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार लोकभारती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोतोलीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली असून सदरच्या कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी लोकभारती पक्षाच्यावतीने करण्यात आली  आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या फंडातुन कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदरचे काम ज्या ठेकेदारास देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत असून इमारती बांधकामाचे फौंडेशनचा दर्जा निकृष्ट असून बांधकामास वाळू न वापरता कमी दर्जाच्या क्रस्लडचा वापर करण्यात आला आहे. इस्टिमेंट प्रमाणे स्टीलचा वापर देखील करण्यात आलेला नाही. पायाखुदाई जादा दाखवून प्रत्यक्षात कमी पायाखुदाई करण्यात आली आहे. एकूणच संपूर्ण बांधकाम खालच्या दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदाराकडून शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार लोकभारती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोतोलीकर यांनी केली आहे. 
     
कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पन्हाळा तालुक्यातील मुख्य आरोग्य केंद्र असून परिसरातील सामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. सदर आरोग्य केंद्राची नवीन इमारत अद्ययावत तसेच चांगल्या प्रतीची असावी, याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन सदरच्या कामाची चौकशी करावी अन्यथा जनआंदोलन करून काम बंद पाडण्याचा ईशारा देखील लोकभारती पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments