✒️ऋषिकेश नलगुणे
आप हिंदु, मै मुसलमान, ये ईसाई, वो सिख,
यार छोडो, ये सियासत है.... चलो इश्क करे
राहत इंदौरींची ही रचना त्यांच्या मृत्युपश्चात आज पुन्हा आठवावी आणि सांगावी लागत आहे. आज सकाळपासून इंदौरी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर २००१ मध्ये केलेल्या एका शायरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातुन त्यांना पुन्हा एकदा देशद्रोहाचं प्रमाणपत्र देत साईडलाईन करण्याचे प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटनांनी चालवले आहेत.
पण हे देशद्रोहचं प्रमाणपत्र देण्यापुर्वी ते काय म्हणतात ते एकदा तरी ऐकलचं पाहिजे, वाचलचं पाहिजे. ते म्हणतात,
मै जब मर जाऊ, मेरी अलग पहचान लिख देना,
लहु से मेरी पेशानी पे हिंदुस्थान लिख देना...
मी जेव्हा मरेन तेव्हा तुम्ही माझी मुसलमान, शायर किंवा आणखी काहीही वेगळी ओळखं करुन द्या. पण माझ्या कपाळावरती हिंदुस्थान असचं लिहा. मी मुसलमान असलो तरी भारतीय आहे, हिंदुस्थानी आहे आणि मेल्यानंतर देखील हिंदुस्थानी हिच माझी ओळख अजरामत रहावी असं ते सांगतात.
भारतात एखाद्या पक्षाला किंवा, त्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात काही बोललं की हल्ली हिंदु माणसाला देखील देशद्रोह्याच प्रमाणपत्र दिलं जातं. बहुसंख्यांकवादाला फाटा देतात तेव्हा खरतर राहत इंदौरी कोणत्या पक्षाच्या विरोधात कधीच नसतात. ते शेरोशायरीला मनोरंजनाची झालर लावून वास्तव परिस्थितीवर आपलं मत मांडत असतं. त्यांनी कधीच कुणाची भिडभाड ठेवली नाही. पुरस्कारांसाठी किंवा मानधनासाठी स्वतःच्या भूमिका त्यांनी गहाण ठेवल्या नाहीत. म्हणूनच गालीबपासून सुरु झालेल्या विद्रोहाच्या परंपरेत इक्बाल, फैज अहमद फैज, बशीर बद्र, मुनव्वर राना, वसीम बरेलवी यांच्यानंतर वर्तमान वारसदार म्हणून राहत इंदौरी यांच्याकडे पाहिले जातं.
राज्यस्थानमध्ये सेहूर शहरात आयोजित एका मुशायऱ्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकांवर टिका केली. त्यावेळी विचारमंचावर भाजपचे मंत्री उपस्थित होते. राहत यांच्या कवितेनं त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आला नाही. त्यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि राहत यांना शहाणपणाचा उपदेश दिला. पण राहत इंदौरी मागं हटले नाहीत. उपस्थित रसिक राहत इंदौरींच्या समर्थनार्थ उभे राहिले. आणि मंत्र्यांना कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला होता. त्यावेळी राहत मंत्र्यांना उद्देशून म्हणाले होते -
जुंबा तो खोल नजर तो मिला, जवाब तो दे
मैं कितनी बार लुटा हूं, मुझे हिसाब तो दे’
गोध्रा इथं झालेल्या हत्याकांडावर त्यांनी केलेली शायरी देखील प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यात त्यांनी कोणाची ही भीड न ठेवता कारसेवकांसोबत काहीच झालं नसल्याचं सांगितलं. घटनेच्या एका वर्षानंतरच आलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली होती. रेल्वे मध्ये आग लावल्याच्या अफवांना माध्यमांनीच हवा दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते -
जिनका मसलक है रौशनी का सफर
वो चिरागों को क्यों बुझाएँगें
अपने मुर्दे भी जो जलाते नहीं
जिंदा लोगों को क्या जलाएँगे
सन २०१४ साली केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर झुंडबळीच्या घटना घडू लागल्या. त्यानंतर मनुव्वर राणा, इम्रान प्रतापगढी, राहत इंदौरी या त्रयींच्या राजकीय विद्रोहात्मक शायरीची चर्चा सुरु झाली. मुनव्वर राणा यांनी सत्तेविरोधात आघाडी उघडल्यानंतर राहत इंदौरी त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक अन्वयार्थाविरोधात त्यांनी अनेक शेर लिहीले. प्रतिगामी गटाच्या राष्ट्रवादाविषयी आपली भूमिका मांडली. सत्ता प्रणित राष्ट्रवादाला त्यांनी फटकारलं. त्यांनी लिहीलं-
‘आंखो में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो
जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो’
नोव्हेंबर -डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा भारतात CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठीची आंदोलनं चालू झाली तेव्हा त्यांनी केलेली 'किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है' ही त्यांची रचना निदर्शनाची टॅगलाईन बनली होती.
लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में
यहां पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है,
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है,
सभी का ख़ून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!
जे आज सत्तेत आहेत, ते उद्या असणार नाहीत. ही लोकशाही आहे, सत्तेवर त्यांची मालकी नाही. स्वतंत्र होताना आणि झाल्यानंतरही सर्वच जाती-धर्माच्या रक्ताने भारताला सुरक्षित ठेवलं आहे. हा देश घडवण्यात सगळ्यांचेच योगदान आहे. त्यामुळे हा देश कुणाच्या बापाचा नाही. असं ते ठासून सांगतात.
संदर्भ : सरफराज अहमद, सोलापूर
0 Comments