लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या - आ. राजेंद्र राऊत


बार्शी /प्रतिनिधी; साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मागणी करावी यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे."

सन 2020 हे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आण्णाभाऊ साठे हे जगद्विख्यात साहित्यरत्न, शिवचरित्रकार, शिवशाहीर, प्रबोधनकार, इतिहासकार, अर्थशास्त्रीय जाणिवांनी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार, स्वाभिमानी, सह्याद्रीच्या उंचीचे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व होते.
समाजातील शोषितांचा वंचितांचा आवाज, भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारी शिरोमणी, विज्ञानवादाचे पुरस्कर्ते, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या भारतीय संविधानाच्या चतुसुत्रीचे भाष्यकार व सत्यशोधक अशा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्र शासनाकडून मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे. याबाबत राज्यातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केंद्राला शिफारस करावी म्हणून मागणी केली आहे. केंद्र शासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होऊन आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल हा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments