"सलाम त्या वीर कोरोना योद्धाना"; डॉ प्रभाकर माने यांचा विशेष लेख


✒️प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने
     प्रमुख, अर्थशास्त्र विभाग
     जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दिवसरात्र  अविरतपणे काम करणारे राज्यातील आरोग्य सेवक,डॉक्टर्स ,नर्सस,प्रशासकीयकर्मचारी व  सफाई कामगार या सारख्या कोव्हिड योद्ध्यांनी राज्यातील कोविड -१९ परिस्थिती हाताळण्यासाठी समर्पित भावनेने केलेलं कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोरोना महामारीचे समुळपणे उच्चाटन करण्याचे ध्येय उराशी बाळगून अहोरात्र सेवा बजाविणारे किंबहुना प्रत्यक्षपणे मृत्यूशी चार हात करणारे कोरोना योद्धा खूप महत्त्वाच्या आहेत.परंतु या देशात  या योद्ध्यांना खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बहिष्कृतेला सामोरे जावे लागत आहे. इकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व मानवी सेवा या भावनेने कार्य करणारे हे योद्धे व दुसऱ्या बाजूला  स्वतः या योद्ध्यांना व योद्ध्यांच्या कुटुंबीयांची समाजाकडून होणारी हेळसांड मन सुन्न करायला लावणारी  आहे.'भारत माता की जय ' म्हणणारी तसेच ' विद्यार्थिदशेत असताना ' भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे देशबांधव आहेत'अशी शाळेत दररोज प्रतिज्ञा घेणारे हे लोक मात्र  या योद्ध्यांचा व परिवारांचा पदोपदी अपमान करताना दिसत आहेत.विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे,इतर प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कसे वेगळे आहोत,
लोकांनी कशा पद्धतीने रहावे असे हे स्वतःला तथाकथित खूप हुशार समजणारे असतात.पण प्रत्यक्षात यांची वर्तणूक मात्र मानवतेला काळीमा फासणारी अशीच आहे. 
       आजच्या कोरोनाजन्य परिस्थितीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दिसून येते  की, चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मनोरंजन विश्वातील कलाकाराचे उदाहरण समजून घ्यावे लागेल.अमिताभ बच्चन व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी आपल्या स्वतःच्या फायदयासाठी म्हणजेच TRP साठी या व्यक्तीच्या कोरोनाला इतके महत्त्व दिले की या देशात फक्त कोरोनाग्रस्त एकच व्यक्ती व परिवार आहे. आता देशाचं काही खरे नाही अशा प्रकारचा पोकळ फार्स तयार केला. अमिताभ बच्चन सारखं या क्षेत्रात काम करणारे असंख्य  हिरो,हिरोईन व सेलिब्रिटी  यांना कोरोना काळात दिलेलं अवास्तव महत्व  लक्षात येते व दुसरीकडे ग्राऊंड लेवलवर काम करणाऱ्या खऱ्या खुऱ्या कोरोना योद्ध्यांना  दिली जाणारी  वागणूक  मात्र सर्व परिचित आहेत.  या देशात सफाई कामगार, सिस्टर,ब्रदर ,डॉक्टर व आशा वर्कर यांना आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की ,माझ्या शेजारील गल्लीमध्ये  सफाई कामगार भाड्याने घर  राहण्यास मागणी करीत होता.नोकरी बद्दल रितसर माहिती समजताच घरमालकाने घर भाड्याने देण्यास नकार दिला. शेवटी जादा भाडे देण्याचे कबूल केल्याने त्याने राहण्यास होकार दिला. दोनच दिवसात शेजारील लोकांना समजले की,हा व्यक्ती महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो त्याचा कोरोना रुग्णांशी संपर्क येतो.अशा गैरसमजातून  त्यानी घर मालकावर दबाव टाकण्यास किंबहुना त्याला घर सोडण्यास भाग पाडले .सरतेशेवटी एक प्रश्न अनुत्तरित राहतो  की या कोरोना युद्धाचा काय दोष आहे की, तो समाजाची  सुश्रुषा सेवा करतो, लोकांचा जीव वाचवितो व संकटाच्या काळात योद्धा म्हणून काम करतो. अशाप्रकारचा विरोधाभास  या व्यवस्थेत दिसून येतो .याच देशात आणखी एक  उदाहरण समजावून घ्यावयाचे असेल ते म्हणजे कोरोना योद्ध्याच्या कामाच्या स्वरूपावर  त्यांचा दर्जा निश्चित होतो. जसे की, श्रेणी-1 व त्यावरील सर्व पदे यांना मानाचे स्थान आणि श्रेणी-2 पासून खालच्या स्तरापर्यंत काम करणाऱ्या योद्धाना मिळणारी वागणूक मात्र ही हीनतेची व तुच्छतेची आहे.असा ही एक विरोधाभासी दिसून आला.अशी  अनेक प्रकारची उदाहरणे आपल्या सभोवताली आहेत. या सर्व परिस्थितीचा व घडामोडींचा  प्रचंड राग या देशातील सच्चा पाईकाला  येत असतो. परंतु या व्यवस्थेबद्दल असे लक्षात येते की , तथाकथित लोकांकडून वांझोटे   सल्ले,सामाजिक भान विसरलेले  पण पोकळ पुरोगामित्वाचा चेहरा व जागृत नागरिकत्वाचे बेगडी रूप दाखविणारे लोक या देशात पावलोपावली मोठ्या संख्येने दिसतात.त्याचवेळेस कोरोना महामारीच्या निर्मूलनासाठी विविध स्वरूपात निस्वार्थी भावनेने देणगी देणारे लोक देखील आहेत.
       कोरोना योद्ध्यांना मिळणारे स्थान हे या देशातील राजकीय व वैचारिक प्रगल्भतेतून निर्माण होत असते.जर या देशातील राजकीय नेत्यांनी सामाजिक परिस्थितीची निर्मिती ही जाणीवपूर्वक आपल्या सोयीनुसार केली असेल तर मात्र हे बदलणे अशक्य आहे.या देशातील सर्व बुद्धिजीवी लोक नेहमी म्हणत असतात की,हे सर्व बदलण्यासाठी  "राजकीय इच्छाशक्ती पाहिजे" या  पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्षांनी आपला अहंकार व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्या मधील विसंवादाला दूर सारून सुसंवाद साधणे हे देश हिताय आहे. याशिवाय कोरोना संबंधित अंतर्गत व बाह्य समस्या दूर होणार नाहीत.हे या देशातील राज्यकर्त्याने समजून घ्यावे व प्रत्यक्षात कृती करावी.ज्यामुळे या  युद्धांना सामाजिक बहिष्कृते ऐवजी ताठ मानेने जगण्याचा आशावादी स्थान प्राप्त झाले पाहिजेे. अशी आशा या कोरोना योद्ध्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.यासाठी एप्रिल महिन्यात  राष्ट्रीय सेवा योजना(NSS), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व युनिसेफ,मुंबई यांनी अशा प्रकारचा संवाद साधण्याचा व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविला होता.अशा प्रकारच्या उपक्रमाची नितांत आवश्यकता या देशाला आहे.
       वरील हे सर्व संकटे,त्यांचे दिखाऊ रूप तसेच पदोपदी होत असणारा अपमान या योद्ध्यांना ज्ञात असूनही "मानव  सेवा हीच खरी  ईश्वरसेवा " असे व्रत मानणारे हे लोक आपलं कार्य प्रामाणिक व जबाबदारीने पार पाडीत आहेत. या कोरोना महामारीच्या काळात या शेकडो योद्ध्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. याचं गांभीर्यही या तथाकथित लोकांना नाही.त्या वीर कोरोना योद्ध्यांना मी मनापासून अभिवादन व्यक्त करतो. त्यांचे हे वीरमरण व कार्य या देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे असेच आहे.अशा या शूर कोरोना योद्ध्यांनी धार्मिक मानवी मूल्य व संस्कृती जपण्याचा महान कार्य केले व करीत आहेत.या थोरवीरांना तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे  काम करणारे देशाची संस्कृती जपणारे  शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व इतर सर्व सच्चे पाईक या सर्वांना कोटी कोटी सलाम...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ■ जय हिंद। जय हिंद । जय हिंद ■

Post a Comment

5 Comments