दरोड्याचा कट उधळला; कुऱ्हाड, कोयता, मिरची पावडरसह ५ जणांना बेड्या बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई



बार्शी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री शिताफीने ताब्यात घेत दरोड्याचा कट उधळून लावला. आरोपींकडून लोखंडी कुऱ्हाड, कोयता, कटावणी, मिरची पावडर तसेच दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.२० वाजता कोरफळे ते यमाई जाणाऱ्या रस्त्यालगत, सोमनाथ शेरखाने यांच्या शेताजवळ, मौजे कोरफळे येथे करण्यात आली.

कोरफळे येथील ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे काही संशयास्पद व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कोणताही विलंब न करता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकासह तातडीने कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून लोखंडी कुऱ्हाड, कोयता, कटावणी, मिरची पावडर आणि दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, तसेच पोलीस अंमलदार प्रदीप जगताप, सागर वाकळे, सोमनाथ खांडेकर, रमेश माने, गोविंद बचुटे, युवराज गायकवाड, अमृत खेडकर, अरुण डुकळे, शंकर खराडे, राजेंद्र कावळे, सिद्धेश्वर लोंढे व महेश माने यांनी सहभाग घेतला. ग्राम सुरक्षा दलाने वेळेवर दिलेली माहिती आणि पोलिसांनी केलेली तत्पर कारवाई यामुळे संभाव्य दरोडा घडण्यापूर्वीच त्याचा डाव उधळण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे करीत आहेत. गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखण्याची बार्शी तालुका पोलिसांची तत्परता या कारवाईतून दिसून आली.

Post a Comment

0 Comments