भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी दमदार सुरूवात करून दिली. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आले होते. पण या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने मिळून पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी असा रेकॉर्ड केला आहे, जो याआधी कोणालाच करता आला नव्हता.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक जोडींपैकी एक आहे. या जोडीने मिळून भारतीय संघाला अनेकदा दमदार सुरूवात करून दिली आहे. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात ही जोडी आधीपासूनच अव्वल स्थानी होती. पण आता ही जोडी ३००० धावांचा पल्ला गाठणारी पहिलीच जोडी ठरली आहे. दोघांनी मिळून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१०७ धावा जोडल्या आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि बेथ मूनीची जोडी दुसऱ्या स्थानी आहे. या जोडीच्या नावे २७२० धावा जोडण्याची नोंद आहे.
0 Comments