बार्शी तालुक्यातील सासुरे गावात कारमध्ये गोळी झाडून गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३४, रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड) या तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. तक्रारदार लक्ष्मण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या आत्महत्येसाठी जबाबदार धरलेल्या पूजा देविदास गायकवाड (वय २१, रा. सासुरे, ता. बार्शी) हिला वैराग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आज तिला बार्शी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गोविंद बरगे आणि पूजा गायकवाड यांची ओळख २०२४ मध्ये तुळजाभवानी कला केंद्र, पारगाव येथे झाली आणि त्यांचे संबंध प्रेमसंबंधात परिवर्तित झाले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची व मौल्यवान वस्तूंची मागणी केली. त्याने तिला मोबाईल, बुलेट मोटारसायकल, सोने-नाणी, सोलापुरातील प्लॉट, नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन तसेच वैराग येथे प्लॉट खरेदी करून दिला. याशिवाय गेवराई येथे बांधलेल्या बंगल्यावर हक्क सांगत तो तिच्या नावावर करून देण्याची मागणीही तिने केली.
तक्रारीत असेही म्हटले आहे की, काही दिवसांपासून पूजाने गोविंदला धमकी दिली होती की, "घर माझ्या नावावर केले नाहीस तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन." या धमक्यांमुळे आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचला होता.
८ सप्टेंबर रोजी पुजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाडच्या आईच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोविंदने स्वतःच्या किया सोनेट कारमध्ये (MH 23 BH 5020) दरवाजे लॉक करून, पिस्तूलाने उजव्या कानाजवळ गोळी झाडून आत्महत्या केली.
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वैराग पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून संशयित पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले. आज तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रकरणाचा तपास एपीआय मिट्टू जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांकडून मृत्यूपूर्वीची कारणमीमांसा, धमक्यांची पुष्टी करणारे पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तसेच आर्थिक व्यवहाराची नोंद तपासली जात आहे. न्यायालयीन कोठडीत असताना संशयित पूजाची चौकशी करून अधिक माहिती मिळवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments