मांजरा प्रकल्प पावसाळ्यातील सतत वाढत्या पाणलोट क्षेत्रामुळे आज शनिवारी दुपारी 2 वाजता 90 टक्के क्षमतेपर्यंत भरला आहे. पाण्याची सुरक्षितता व धरण पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने चार वक्रद्वारे प्रत्येकी 0.25 मीटर उंचीने उघडून एकूण 3494.28 क्यूसेक्स (98.96 क्यूमेक्स) पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडला आहे.
धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. या आवकानुसार विसर्गात वाढ किंवा कपात करण्याची कार्यवाही प्रशासन करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अचानक होणाऱ्या विसर्गामुळे मांजरा नदीकाठावरील तसेच संभाव्य पुरग्रस्त गावांमधील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. तसेच कुठलीही जिवीत अथवा वित्तहानी होणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.
नदीकाठावरील नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक हालचाल टाळावी. नदीपात्रात पशुधन, वाहने अथवा जनावरांना सोडू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मांजरा प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या या पाण्यामुळे नदीपात्रात प्रवाह वाढणार असल्याने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments