धाराशिव: कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जलसिंचनाचे स्वप्न साकारण्याकडे वाटचाल, २५ हजार ७९८ हेक्टरला मिळणार सिंचनाचा लाभ

धाराशिव |

पाण्याअभावी कायम दुष्काळी स्थितीशी सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तनशील प्रकल्प ठरत आहे. हा प्रकल्प मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यासाठी सिंचनाची मोठी सुविधा निर्माण करणार आहे.या माध्यमातून जिल्ह्यातील दोन उपसा सिंचन योजनेतून २५ हजार ७९८ हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाच्या १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निर्णयानुसार,या प्रकल्पासाठी २३.६६ अब्ज घनफूट (अ.घ.फु.) अर्थात टीएमसी पाणी वापरासाठी ११ हजार ७२६ कोटी ९१ कोटी रुपये इतक्या निधीच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह विविध कामे हाती घेतली आहेत.

प्रकल्पाची उद्दिष्टे व जलवाटप

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून उजनी जलाशयात उपलब्ध ६३ अ.घ.फु. (टीएमसी) पाण्यापैकी २५ अ.घ.फु.(टीएमसी) पाणी मराठवाड्यासाठी प्रस्तावित आहे.यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी २१ अ.घ.फु.(टीएमसी) पाणी तर सिना नदीतून ४ अ.घ.फु. पाणी समाविष्ट आहे.

या प्रकल्पाच्या दोन प्रमुख टप्प्यांमध्ये खालीलप्रमाणे पाण्याचा वापर निश्चित करण्यात आला आहे –

टप्पा १ (Phase I) : ७ अ.घ.फु.(टीएमसी) पाणी वापरासाठी ७ हजार ४१ कोटी ३९ लाख रुपये निधी.

टप्पा २ (Phase II) : १६.६६ अ.घ.फु. (टीएमसी) पाणी वापरासाठी ४ हजार ६८५ कोटी ५२ लक्ष रुपये निधी.


लाभक्षेत्र व सिंचन योजनेचा विस्तार

हा प्रकल्प उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांना सिंचनाचा लाभ देणार आहे. त्यासाठी दोन प्रमुख उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहेत –

उपसा सिंचन योजना क्र. १

या योजनेंतर्गत ३ अ.घ.फु. पाण्याचा उपयोग करून ५ टप्प्यांत पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम,वाशी,कळंब आणि धाराशिव या तालुक्यांतील ३५ गावांमध्ये १४ हजार ९३६ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

तालुका निहाय लाभक्षेत्र:

परंडा – १,७७४ हे.
भूम – ८,२७६ हे.
वाशी – १,३६९ हे.
कळंब – २,४२९ हे.
धाराशिव – १,०८८ हे.

उपसा सिंचन योजना क्र. २

या योजनेंतर्गत २.२४ अ.घ.फु.(टीएमसी) पाण्याचा उपयोग करून ६ टप्प्यांत पाणीपुरवठा केला जाणार आहे.यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,उमरगा व लोहारा या तालुक्यांतील ५४ गावांमध्ये १० हजार ८६२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

तालुका निहाय लाभक्षेत्र
तुळजापूर – ६,६५८ हे.
उमरगा – २,०५७ हे.
लोहारा – २,१४७ हे.


कामांची सद्यस्थिती व प्रगती

या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेतली आहेत.

उपसा सिंचन योजना क्र. १
सध्या ५७ टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.

उपसा सिंचन योजना क्र. 
सध्या ६४ टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.


विशेषतः टप्पा क्र. २,३ व ५ मधील कामे जवळपास पूर्ण झाली असून टप्पा क्र.१ व ४ मधील उर्वरित कामे पुढील ८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पंप चाचणी व पाणीपुरवठा व्यवस्थापन

या प्रकल्पातील पाणी उपसा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत व यांत्रिकी उपकरणांचा समावेश आहे.त्यासाठी चाचण्या टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन आहे.यामध्ये टप्पा क्र. ५ (सिंदफळ ते रामदरा) ची चाचणी येत्या काही दिवसांत होणार आहे.त्यानंतर उर्वरित टप्प्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहे.

जलसिंचन क्रांती

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील मोठ्या भूभागाला पाणी उपलब्ध होणार आहे.यामुळे सिंचन क्षमता वाढून उत्पादनक्षमता सुधारेल.भविष्यात या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरणार आहे. शासनाच्या प्रभावी नियोजनामुळे प्रकल्पाच्या कामांना वेग मिळाला आहे आणि पुढील काही वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील कृषी अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.



Post a Comment

0 Comments