ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस हे पडद्यामागून कटकारस्थान करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात करावी, असं राऊत म्हणाले आहेत. आज (17 ऑगस्ट) ते मुंबईत बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील जनता कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही. ज्याप्रकारे त्यांनी दळभ्रदी आणि घाणेरडं राजकारण केलंय, त्याचा अंत आता जवळ आला आहे.”, अशी भविष्यवाणीच संजय राऊत यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत देखील भाष्य केलं. “महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिलेत. गेल्या 70 वर्षात राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे, हे जर फडणवीसांना माहिती नसेल तर त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले आहे.”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
“मोदींनी कॉँग्रेसच्या योजनांची फक्त नावं बदलली, योजना जुन्याच”
त्यांना आपलं सरकार जाईल ही भीती का वाटतं आहे? त्यामुळेच ते लोकांना धमक्या देत आहेत, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. पुढे राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला. “मोदींनी काँग्रेस काळात सुरु असलेल्या योजनांची नावं बदलून त्याच सुरु ठेवल्या. यात नवीन असं काही नाहीये. फक्त योजनांची नावं बदलली आहेत, बाकी योजना त्याच आहेत.”, असं राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “सरकार जाणार या भीतीमुळे फडणवीसांची झोप उडालीये. त्यांनी आता गाशा गुंडाळण्यास सुरुवात करावी. ज्याप्रकारे त्यांनी दळभ्रदी आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरु केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे. मोदी आणि शाहा यांचे बहुमत महाराष्ट्राने गमावले.”, अशी टीका राऊत यांनी केली
0 Comments