वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!


 29 जूनरोजी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताने आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ही विजयी कामगिरी केली.

नैसर्गिक परिस्थितीमुळे टीम इंडियाला काही दिवस बारबाडोस येथे थांबावं लागलं. मात्र त्यानंतर आता टीम इंडिया भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ नवी दिल्लीत उद्या 4 जुलैरोजी दाखल होतील.

रोहित शर्माची पोस्ट चर्चेत
त्यापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत एक मोठी माहिती दिली आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताचा स्टार प्लेयर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.त्यानंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने देखील टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

चाहत्यांना त्यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता. अशात रोहित शर्माने केलेलं एक ट्वीट चर्चेत आलंय. त्याने ट्वीटद्वारे चाहत्यांना आवाहन केलंय. रोहित शर्माने वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना आमंत्रित केलंय.

रोहित शर्माचे चाहत्यांना आवाहन
टीम इंडिया पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने येणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफीसह टीम इंडियाच्या खेळाडूंची ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात येईल. या संदर्भातच रोहित शर्माने ट्वीट करत चाहत्यांना बोलावलं आहे.

“तुमच्यासह या खास क्षणाचा आनंद साजरा करु इच्छित आहे. चला, तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणुकीसह वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा करूयात. घरी येत आहे”, असं रोहितने  एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments