बार्शी |
नऊ जुलै रोजी पुणे येथे पिक विमा कंपनी व आयुक्त कार्यालयावर झालेल्या आंदोलनानंतर शासनाने मागणीप्रमाणे राज्यातील खरीप २०२३ च्या शेतकऱ्यांसाठी ७१५० कोटी रुपये मंजूर करून रक्कम सोडत असल्याचे लेखी पत्र दिले आहे. मात्र, या पत्रात नमूद केल्याप्रमाणे वीस दिवसांच्या आत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची भरपाईची रक्कम जमा न झाल्यास ऑगस्ट महिन्यात संबंधित मंत्री व कंपन्यांच्या कार्यालयावर होणाऱ्या आंदोलनात राज्यातील वंचित सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केले आहे.
शंकर गायकवाड बार्शी तालुक्यातील भातंबरे गावामध्ये अंबाबाईच्या मंदिरासमोरील सभामंडपात झालेल्या शासकीय नुकसान भरपाई व पिक विम्याच्या संदर्भातील बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीत अमोल खुणे, बालाजी डोईफोडे, स्वप्निल पाटील, बापू मोहिते, दिलीप जाधव, पांडुरंग खुणे, नामदेव खुणे, बापू खुणे, बाळासाहेब पवार, सुभाष पाटील, सुरज खुणे, भैय्या पाटील, विलास पाटील, पप्पू मिंढे, नितीन पवार, प्रल्हाद उघडे, प्रवीण तांबे, राम निकम, सुधाकर पवार, तुकाराम खुणे, दीपक खुणे, आबा माळी, शिवाजी झोंबाडे, दगडू बोडके, सोनू पाचपुते आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी आणि शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक रामराव काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर खुणे यांनी केले तर आभार तानाजी साळुंखे यांनी मानले.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आश्वासनानुसार पिकविमा न मिळाल्यास पुढील आंदोलनात सर्व वंचित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आम्ही संघर्ष करू."
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार पिकविम्याची रक्कम तात्काळ जमा करावी, अन्यथा आगामी आंदोलनात सर्व वंचित शेतकरी सहभागी होतील, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे.
0 Comments