मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा एकदा मोठी संधी दिली आहे. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचं देखील नाव आहे. त्यामुळे त्यांचा अखेर राजकीय वनवास संपल्याचं म्हटलं जातंय.

पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का?, याबाबत चर्चा केली जात आहे.

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी
आगामी विधानसभा निवडणुकामध्ये भाजपला पंकजा मुंडे यांच्या रूपात ओबीसी चेहरा म्हणून मोठा फायदा होईल. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या पराभवानंतर बीडमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते. काही युवकांनी तर आपलं जीवन संपवलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पक्षाला मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता होती.

त्यामुळे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांचा विचार करण्यात आला. पंकजा मुंडे यांचे समर्थन करणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. यामुळेच ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली गेली असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून 5 जणांना संधी
पंकजा मुंडे या बऱ्याच काळापासून सत्तेच्या वर्तुळाबाहेर होत्या. 2019 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून पक्षात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी मिळाली नाही. अशात त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

लोकसभेत बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपणार असल्याचं म्हटलं जातंय.

Post a Comment

0 Comments