बीड जिल्ह्यातील परळी शहरात दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटना वाढतच आहेत. परळीतील बँक कॉलनीत झालेल्या गोळीबारात मरळवडीचे धनंजय मुंडे समर्थक सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन गटात काही आर्थिक कारणामुळे वाद झाला होता, मात्र हा वाद टोकाला गेल्यामुळे हा गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये परळी तालुक्यातील मरळवाडी येथील युवा सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परळी शहरात तणावपूर्व वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र हा वाद आर्थिक देवाणघेवाणीतून झाला होता अशी माहिती समोर आलेली नाही. या घटनेतील गंभीर जखमी ग्यानबा गित्ते यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेतील सरपंच बापू आंधळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गीते यांच्यासह अन्य चार जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परळी शहरातील शांतता भंग होऊ नये म्हणून रात्री पासून परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0 Comments