पंकजा मुंडे यांच्या पराभवाने नैराश्य, ऊसतोड कामगार युवकाची आत्महत्या


बीड |

भाजपच्या नेत्या तथा लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला म्हणून समर्थक पांडुरंग सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांकडून याला दुजोरा देण्यात आला आहे.

पांडुरंग सोनवणे हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक होता. डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग हा अल्पभूधारक आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी व लहान मुलगा आहे. या घटनेमुळे पांडुरंगच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर खूप दुःखी झाला होता. त्याच दिवशी त्याने आत्महत्या करणार असल्याचे ग्रामस्थांना बोलून दाखविले. गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली व त्याला आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक, अशी विनंती ही केली होती. मात्र निराश झालेल्या पांडुरंगने शेवटी आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments