सुप्रिया सुळेंनी विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण


महाराष्ट्रात लोकसभा निकालापूर्वी अनेक उलाढाली झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांचे दोन गट निर्माण झाले. यामधील सर्वात मोठी फूट ती म्हणजे पवार घराणे. राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले. यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

पवार विरुद्ध पवार लढा शरद पवारांनी जिंकला :
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच अजित पवार यांनी त्यांच्या गटातील नेत्यांसह भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची माल गळ्यात घातली. अजित पवारांच्या या निर्णयाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाने 4 जागांवर निवडणूक लढली. मात्र त्यांना अवघ्या एका जागेवर विजय मिळवला आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना देखील रंगला होता. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली तर शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली. मात्र निकालादरम्यान शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आणि जनतेने त्यांना कौल दिला.

बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यावेळी नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामतीत जंगी स्वागत केले. मात्र त्यांनी बारामतीत येताच सर्वात अगोदर अजित पवारांचे घर गाठले.

त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या घरी जाऊन आई आणि त्यांच्या काकी आशाताई पवार यांची देखील भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. सुप्रिया सुळेंच्या या कृतीने त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत. तसेच राजकारणामध्ये विरोध असला तरी त्याच्यापुढे नात्याचा दोर मात्र मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments