‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ



राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निकाल लागल्यानंतर अजित पवार गट चर्चेत आला आहे. भाजपच्या राज्यातील अपयशामागे अजित पवार गटाला सोबत घेतल्याचं कारण आरएसएसने दिलं होतं. त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. भाजपकडूनही पराभवामागील अनेक कारणे देण्यात आली होती.

त्यानंतर मोदींच्या मंत्रीमंडळात देखील अजित पवार गटाला एकही जागा देण्यात आली नाही. विरोधकांनी यावरून अजित पवार गटाला डावलण्यात आलं असं म्हणत डिवचलं होतं. मात्र, हा मुद्दा इथेच थांबला नाही. यानंतर अजित पवार गटातील बडे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेनी जोर धरला.

छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा
भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. पण, महायुतीमधील वादामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. त्यातच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील भुजबळ यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे सध्या भुजबळ नाराज असल्याचं म्हटलं जातंय.


काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये देखील भुजबळ यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यात कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी छगन भुजबळ यांच्या बद्दल धक्कादायक दावा केला होता. भुजबळ यांची अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा नव्हती. त्यांनी मला हे खासगीत सांगितलं होतं, असं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा अजूनच व्हायला लागल्या.


भुजबळांची नाराजी महायुतीचं टेंशन वाढवणार?
अशात नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनी वेगळा सुर बोलून दाखवल्याने आता तर छगन भुजबळ सत्तेमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दुसरीकडे छगन भुजबळ यांना लोकसभा तसेच राज्यसभेला डावलल्यामुळे ओबीसींमध्ये देखील नाराजी दिसून येत आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.


त्यामुळे आता पुढे भुजबळ यांनी निर्णय घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पाहायला गेलं तर भुजबळ यांची ही नाराजी लोकसभा निवडणुकीपुर्वी पासूनची आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये बराच गोंधळ उडल्याचं दिसून आलं होतं. या जागेवर भुजबळ यांनी दावा केला होता. मात्र अखेरच्या क्षणी हे तिकीट एकनाथ शिंदेंच्या हेमंत गोडसेंना देण्यात आलं. त्यामुळे आता पुढे भुजबळ काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. सध्या तरी त्यांच्या नाराजीच्या चर्चा होत आहेत.

Post a Comment

0 Comments