बार्शीत मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न



बार्शी |

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती सभागृह या ठिकाणी माढा, बार्शी व करमाळा या तीन तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा दिनांक 14 जून 2024 रोजी संपन्न झाली.

या सहविचार सभेसाठीचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे होते. सोबतच सन्माननीय शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठारे, जि.प.सोलापूरच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, जि.प.सोलापूर शिक्षण विभाग लेखाधिकारी राऊत, वेतन व भविष्य निर्वाह निधीचे अधीक्षक दिपक मुंडे, जि.प.सोलापूर शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक मस्के, बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुहास गुरव, बार्शी न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे व माढा,बार्शी, करमाळा या तीन तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. 

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व श्री.शि.शि.प्र.मंडळ बार्शीचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्शीचे गटशिक्षणाधिकारी सुहास गुरव यांनी केले.

याप्रसंगी सन्माननीय शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वटारे यांनी शासनाच्या विद्यार्थी कल्याणच्या असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व त्या योजना मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबवाव्यात अशी सूचना केली. तसेच कोणताही विद्यार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये याची मुख्याध्यापकांनी काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी मुख्याध्यापकांना आवाहन केले. तसेच सुलभा वठारे यांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षण योजनांची सविस्तरपणे माहिती दिली. 
        
 त्यानंतर जि.प.सोलापूर शिक्षणाधिकारी सचिन जगताप  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये आपापल्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी वर्षभरातील नियोजन कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. वर्षभर शालेय कामकाज पार पडत असताना मुख्याध्यापकांना येत असलेल्या विविध समस्या बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
 
यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये जयकुमार शितोळे यांनी सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे व विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे नमूद केले. 
       
या कार्यक्रमात लेखाधिकारी माननीय राऊत यांनी शाळाशी संबंधित आर्थिक बाबीचा आढावा मांडला. तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधीचे अधीक्षक मुंडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध अनुदानाविषयी मार्गदर्शन केले व मिळालेल्या अनुदानाचा वेळेत वापर होणे कसे आवश्यक आहे. हे समजावून सांगितले. तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सर्वांनाच सदैव सहकार्य केले जाईल याची ग्वाही दिली परंतु त्याच वेळेस मुख्याध्यापकांनीही आपल्या शाळांची देयके वेळेत सादर करणे आवश्यक असल्याचे नमूद करतानाच कोणत्याही कर्मचाऱ्याची देयके मुख्याध्यापकांनी वेळेत सादर केली पाहिजेत, कोणत्याही कर्मचाऱ्याची देयके सादर करताना अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

या कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी हवेली यांनीही मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे यांनी केले तर या सहविचार सभेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व सन्माननीय अधिकारी वर्गांचे व मुख्याध्यापकांचे आभार बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी माननीय अनिल बनसोडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments