अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब


 लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राज्यसभा निवडणुकीची खलबतं सुरु झाली आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून अनेक नाव समोर आली होती. यामध्ये पार्थ पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज दाखल करणार :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी आनंद परांजपे, मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राज्यसभा उमेदवाराची अधिकृत घोषणा आज करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच संबंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन व अनेक दिग्गज नेत्यांची नाराजी ओढवून अजित पवार यांनी घरातलाच उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता अजित पवारांची ही खेळी कितपत योग्य ठरते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यसभेची ही रिक्त जागा प्रफुल्ल पटेल यांची आहे. त्यामुळे पटेलांच्या जागी राज्यसभेवर अजितदादा कुणाला पाठवणार? हा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. अजितदादा राज्यसभेसाठी नवीन चेहरा देणार का? घरातला चेहरा देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मात्र आता हा सस्पेन्स संपल्याचं दिसतं आहे

Post a Comment

0 Comments