राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…


1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान झाले आणि लोकशाहीच्या उत्सवातील अंतिम पडाव पूर्ण झाला. आता 4 जूनच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक्झिट पोल जाहीर झालेत. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोलवर मी कसा बोलणार मी राजकारणातच नाही. मी ज्या दिवशी नाव घेतलं त्या दिवशी माझ्या समाजाची प्रतिष्ठा पणाला लागेल, असं मनोज जरांगे म्हणाले.

मी नाव घेऊन कोणाला पाडा म्हटले नाही. मी मराठ्यांना तुमच्या मताची किंमत केली पाहिजे, भीती वाटली पाहिजे, असे मी म्हटले होते. राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार म्हणजे कर्माची फळ, नियतीला सहन होत नाही, हा निसर्गाचाच नियम आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही- मनोज जरांगे
सत्ता गोड बोलून घ्यायची आणि त्या जनतेवर पुन्हा अन्याय करायचा. चार-पाच दिवसापासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू आहेत. आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय? आम्हाला फक्त आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे, असं जरांगे म्हणाले.

सर्व जातींना यांनी फसवलं आहे. धनगर, बंजारा, लिंगायत सर्वांची परिस्थितीच आहे. शेवटी नेते हरवायला लावते. अन्यायाला वाचा फोडायला जनतेला लोकशाही रूपी हत्यार हातात घ्यावे लागले, असंही यावेळी जरांगे म्हणालेत.

सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, आम्हाला राजकारणात यायचं नाही. नाहीतर 288 विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करणार मग मात्र खूप फजिती होईल. 4 तारखेला मोठ्या संख्येने आंदोलक येणार आहेत. मी आंदोलनावर ठाम आहे, असंही जरांगेंनी सांगितलं

Post a Comment

0 Comments