बार्शी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात एका डाटा एंट्री ऑपरेटरला १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांना बऱ्याच दिवसांपासून धान्य मिळत नसल्यामुळे त्यांनी अनेक वेळा रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी यांच्या कडे चकरा मारल्या होत्या. त्यांच्या पिवळ्या रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्यामुळे, त्यांनी १४ जून २०२४ रोजी बार्शी तहसील कार्यालय पुरवठा शाखेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज केला होता.
अर्ज करताना, श्रीमती काळे यांनी तक्रारदारांचा अर्ज न स्वीकारता, धान्य मिळवून देण्यासाठी १५०० रुपये लाच मागितली आणि तक्रारदारांना १८ जून २०२४ रोजी अर्ज आणि १५०० रुपये घेऊन येण्यास सांगितले.
त्यानुसार, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) शी संपर्क साधला आणि १८ जून २०२४ रोजी एसीबीच्या सापळ्यात श्रीमती वर्षा भगवान काळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांनी तक्रारदारांकडून १५०० रुपये स्वीकारले असता, त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणात तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकांचा काही संबंध आहे का, याबाबत अजून स्पष्टता नाही. तपासणी सुरू असून, श्रीमती वर्षा काळे यांनी ही लाच परस्पर घेतली की या प्रकरणात इतर कोणाचाही सहभाग आहे, हे शोधण्याचे काम एसीबी करत आहे.
0 Comments