कोल्हापूर |
ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील यांचे निधन झाले आहे.
ते ७१ वर्षांचे होते. रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येवून बाथरुममध्ये पडल्याने त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मात्र, त्यांच्या मेंदूची सूज कायम असल्याने गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर २३ मे रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली.
आज सकाळी १० वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. मात्र या दुखातून सावरत ते हिंमतीने उभे राहिले होते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत तब्बल महिनाभर त्यांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख
करवीर विधानसभा मतदारसंघातून पी. एन. पाटील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होत. करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पी एन पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख होती. आमदार पाटील यांनी तब्बल १८ वर्षे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली. पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी विधानसभेच्या १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सहा निवडणूका लढवल्या होत्या.
पहिल्या १९९५ च्या लढतीत ते शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून ३३०२ मतांनी आणि १९९९ च्या निवडणूकीत ते ८,६०५ मतांनी पराभूत झाले. परंतू त्यानंतर २००४ मध्ये पवार यांचा तब्बल ४४ हजार ९९७ मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा विजय मिळवला होता.
0 Comments