“दमदाटी करायची भाषा करणं सोडून द्या नाहीतर…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारापुणे |

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळतात. काही दिवसांआधी अजितदादांनी अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचा आता अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील ओतूर येथे सभा घेण्यात आली तेव्हा कोल्हेंनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

अजितदादा म्हणतात की अमोल कोल्हेंना पाडणार. त्यावर मला प्रश्न पडतो की माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पाडणार असं म्हणता. मी बिबट्याबाबत, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले ती माझी चूक झाली का? दिल्लीसमोर स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक झाली का? तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. पाडापाडीची भाषा आणि दमदाटीची भाषा करणं सोडा. काहीही झालं तरीही आमचा स्वाभिमान कधीही झुकणार नाही, अशा कडक शब्दात अमोल कोल्हे  यांनी अजितदादांना सुनावलंय.

अमोल कोल्हे हे लढायला तयार नव्हते ते आता लढायला कसे तयार झाले? असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला होता. त्यावर अमोल कोल्हे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, अजितदादा ही विचारांची लढाई आहे. स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून ताठ मानेने जगायला आणि लढायला शिकवलं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

पुण्यातील सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यावर देखील अमोल कोल्हे यांनी पलटवार केला. होय आमचे साहेब हा आमचा आत्मा आहे. ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाच आत्मा पुढं आला होता, असं म्हणत मोदींनी केलेल्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी पलटवार केला.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, हा आमचा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर प्रश्नासाठी, तरूणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र आत्मा मानतो आणि त्याला आम्ही कायमस्वरूपी जपतो. आमचा आत्मा घर फोडत नाही, पक्ष फोडत नाहीत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला केला.

Post a Comment

0 Comments