हिंगणी जलाशयावर फ्लेमिंगो परदेशी पाहुण्यांचे आगमन

बार्शी| 

एरव्ही उजनी जलाशयामध्ये आढळणारे फ्लेमिंगो बार्शी तालुक्यातील हिंगणी प्रकल्पाच्या पाणथळ भागामध्ये दिसून येत आहेत त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पक्षीप्रेमिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे मात्र प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने फार दिवस फ्लेमिंगो इथे राहतील अशी शक्यता कमी आहे.

बार्शी तालुक्याला लाभलेल्या अपूर्व भौगोलिक स्थितीमुळे हिवाळ्यात अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी न चुकता पाणथळांच्या ठिकाणी हजेरी लावतात. तालुक्यात हिंगणी, जवळगाव, ढाळेपिंपळगाव या मध्यम प्रकल्पांसह अनेक पाझर तलाव, साठवण तलाव असल्यामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पक्षी बार्शी तालुक्यात येतात.परदेशी पाहुण्यांचा हिवाळ्यातील वाढता मुक्काम जैविक समतोल साधत असल्याने तालुक्यातील पक्षी वैभव वाढत आहे.मात्र यावर्षी पडलेला दुष्काळ आणि झपाट्याने धरणातील घटणारी पाणी पातळी या पाहुण्यांसाठी धोकादायक ठरली असून ठराविक पक्षी वगळता इतर पक्षांनी सपशेल पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील रोहित म्हणजेच फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांनी हिंगणी जलाशयात हजेरी लावली आहे.


ढाळेपिंपळगाव मध्यम प्रकल्प कोरडा पडला असून हिंगणी आणि जवळगाव मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी मृत साठ्याला जाऊन पोचली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्षांसाठी सहज अन्न उपलब्ध होत आहे तर काही ठिकाणी अन्नाचीच कमतरता जाणवत आहे. हिंगणी जलाशयामध्ये यावर्षी प्रथमच फ्लेमिंगो पक्षांचे थवे दिसले असून पक्षी मित्र विशाल गाडे यांनी त्यांना कॅमेराबद्ध केले आहे.

बार्शी तालुक्यात पक्षांसाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी समर्पण,अन्न आणि दुप्पट सुरक्षितता जाणवत आहे. त्यामुळे स्थानिकांसह परदेशी पक्षी बार्शी तालुक्यात दिसून येत आहेत.स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी या भागात आले आहेत. या परदेशी पाहुण्यांवर वन विभागाचे अधिकारी सचिन पुरी आणि बालाजी धुमाळ यांनी लक्ष ठेवले असून त्यांची सुरक्षितता जपण्यावर भर दिला आहे.

Post a Comment

0 Comments