माजी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे सापडली मोठी अपसंपदा; पत्नी व मुलाविरुद्धही गुन्हा दाखल



सोलापूर |

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना सेवा कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ०५ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा किमतीची अपसंपदा संपादित केल्याप्रकरणी किरण लोहार, त्यांची पत्नी व मुलाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. 

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (वय-५० वर्षे) यांचे शिक्षण विभागात कर्तव्य बजावत असताना अनेक तक्रारी पुढे आल्याने कारकीर्द नेहमी चर्चेत राहिली होती. त्याच्या कारभाराच्या चौकशीनंतर त्यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा १११.९३ टक्के अधिक संपत्ती आढळली. त्यांचा अपसंपदा कालावधी, १५ नोव्हेंबर १९९३ ते  ३१ ऑक्टोबर २०२२ असा असून त्यांच्याकडे ५ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा अधिक आपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार यांच्याकडे ०५, ८५, ८५, ६२३.८ रुपयांची अपसंपदा आढळली.                      

किरण लोहार यांना त्यांची पत्नी नामे सौ. सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. किरण अनंत लोहार ( वय- ५० वर्ष, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर), पत्नी सौ. सुजाता किरण लोहार (वय- ४४ वर्ष) आणि मुलगा निखिल किरण लोहार (वय-२५ वर्ष सर्व रा. प्लॉट नं. सी. २, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक चौकशी अधिकारी म्हणून होते. पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधा.

Post a Comment

0 Comments