ओबीसी नेत्यांचे महामेळावे काय कामाचे ; हक्कासाठी विद्यार्थी मात्र उघड्यावरलेखन : स्वराज पाटील, लातूर

गेल्या महिनाभरापासून मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसींच्या संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी, म्हणून बेमुदत साखळी आंदोलन करत आहेत. मंत्रिमंडळातील संबंधित मंत्री आपल्या पीएच्या माध्यमातून चर्चेसाठी बोलवतो म्हणतात परंतु ते तिकडेच गायब होतात.  

महाराष्ट्रात एकीकडे ओबीसी नेते आमच्या लेकरांच्या हक्काच घेऊ नका म्हणून मोठमोठ्या जाहिरसभा, मेळावे घेऊन स्वतः ओबीसी असल्याचा आव आणत आहेत आणि दुसरीकडे मात्र ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी दिवाळीसारख्या सणाला घर दार सोडून आझाद मैदानावर २९ दिवसापासून आंदोलन करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, आजपर्यंत या आंदोलनाला एका ही ओबीसी नेत्यांनी भेट घेतली नाही किंवा विचारपूसही केली नाही. आणि महाराष्ट्रात ओबीसी खतरे में आहे, ओबीसी आरक्षणाला कोणी धक्का लावला तर हात पाय तोडण्याची भाषा करुन ग्रामीण भागातील गुण्या गोविंदाने राहाणार्‍या समाज बांधवात तेढ निर्माण करुन दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

आज काल जे महाराष्ट्रात ओबीसी नेते जे मेळावे, सभा घेत आहेत हे फक्त येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत स्वतःची वोट बँक मजबूत करण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. जर हे नेते खरंच समाजाच्या भल्यासाठी काही करत असते तर आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला साधी भेट तरी दिली असती. मंत्रीमंडळात एक मंत्री तर उघडपणे मी समाजाचा किती सच्चा नेता आहे हे मोठ मोठ्या सभेमध्ये भाषणे करुन आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या मंत्र्यांनी एकदाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, असे आंदोलन करणारे विद्यार्थी बोलत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही लहान लहान बाळाच्या आई स्वतःच्या मुलांना घरात सोडून आंदोलन करत आहेत. एकिकडे दिवाळीसारख्या मोठ्या सणाला देखील हे विद्यार्थी काळी दिवाळी म्हणत आंदोलन करत आहेत आणि दुसरीकडे ओबीसी नेते म्हणून महाराष्ट्र मिरविणारे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरीब जनतेच्या मनात संशयाचे वातावरण तयार करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.यासर्व घटनेमध्ये ग्रामीण भागातील अशिक्षित आणि बेरोजगार तरूण आणि नागरिक यांचं मरण होत आहे. 

दोन दिवसापूर्वी हिंगोलीत रामलीला मैदानावर झालेल्या मेळाव्यातून तर एका नेत्याने हद्दच केली आणि ओबीसी बांधवांना हातात कोयता घेऊन चक्क हात पाय तोडण्यासाठी आव्हानच दिलं आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ओबीसी बांधव बळी पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील समाज बांधवांना एक विनंती आहे की, महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे जाहिर केलेले आहे. त्यामुळे आपण कोणत्याही नेत्याच्या आव्हानाला बळी न पडता आझाद मैदानावर सुरू असलेल्या संशोधक विद्यार्थीच्या शिष्यवृत्ती आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारकडून त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करत आहे.

Post a Comment

1 Comments