कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर |

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 2023 दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या यात्रा कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  
         
कार्तिकी यात्रा 2023 च्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही. सी. रूम येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांत अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
       पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व्यतिरिक्त अन्य सोयी सुविधा तसेच विशेष बाब म्हणून खर्च करावयाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथे येणारा एक ही भाविक पायाभूत सोयी सुविधा पासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
       
 यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या आठ ते दहा लाख भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात शौचालय उपलब्ध ठेवावीत. शौचालयासाठी पाणी व शौचालय साफसफाई करणारे कर्मचारी ठेवावे. आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील शौचालय ठेवावीत तसेच शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त निर्माण करण्यात येणाऱ्य 5 आपत्ती व्यवस्थापन कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी  मध्यवर्ती नियंत्रण कक्ष  तयार करावा. दर्शन रांग खूप लांब जात असल्याने दर्शन रांगेत ठीक ठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण कराव्यात. तसेच स्कायवॉकच्या ठिकाणीही भाविकांसाठी बैठकीची व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
    पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 2023 साठी संपूर्ण राज्य व अन्य राज्यातूनही लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत येत असतात. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. तरी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून अत्यंत चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी करून दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी पंढरपूर येथे येऊन करणार असल्याचेही सांगितले.
  
 यात्रा कालावधीत पंढरपूर येथे जनावरांचा बाजार भरत असतो, परंतु मागील एक दोन वर्षात लंम्पी आजारामुळे जनावरांचे  बाजार भरले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जर जनावरांचा बाजार घेण्याचे नियोजन असेल तर लंम्पीग्रस्त जनावरे या मेळाव्यास येणार नाहीत याबाबत पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी पुढील एक-दोन दिवसात जिल्हास्तरावर या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन पंढरपूर येथे जनावरांचा बाजार भरवावा का याची खात्री करावी असेही त्यांनी सूचित केले.
        
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा 2023 साठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक सर देशपांडे यांनी पोलीस विभागाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनीही बैठकीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments