शरद पवारांचा आजचा सोलापूर दौरा अचानक रद्द, कारण अद्याप अस्पष्ट



सोलापूर |

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केलाय.

शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील कार्यक्रमाला जाणार नाहीत. पंढरपूर येथे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार होती. शरद पवार यांचा दौरा का पुढे ढकलला याची मला माहिती नाही, पण ही बैठक एकत्रित होती त्यामुळे जर ते नसतील तर मी देखील जाणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. मात्र अजित पवारांचा ठरलेला दौरा पार पडणार आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा 50 मिनिटे आधी अजित पवार  पिंपळनेर येथे पोहचणार  आहे.

शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आजच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे सध्या बारामतीत आहे. बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला जाणार आहेत. दौरा का रद्द करण्यात आला याची कोणतेही कारण समोर आले नाही. अचानक दौरा रद्द झाल्याे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले.

Post a Comment

0 Comments