भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी (९ ऑक्टोबर) पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर देशातले राष्ट्रीय पक्ष आणि या पाचही राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे. अनेक पक्षांनी सोमवारी पत्रकार परिषदा घेतल्या. काँग्रेसनेही पत्रकार परिषद बोलावली होती.
काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत आगामि विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी एक चूक केली आणि या चुकीमुळे आता ते समाज माध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहेत.
राहुल गांधींच्या चुकीमुळे भारतीय जनता पार्टीला राहुल गांधीवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजपाने राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेतल्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स (ट्विटर), फेसबूक, यूट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी निवडणुकीआधीच पराभव मान्य केल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की राजस्थानमधलं सरकार जातंय, छत्तीसगडमधलं सरकार जातंय, तेलंगणातलं सरकारही…सॉरी…मी उलट बोललो. तुम्ही (पत्रकार) मला गोंधळात टाकता. दरम्यान, राहुल गांधी यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की आगमी पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल. राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं.
राहुल गांधी यांनी काल काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. याचवेळी पाच राज्यांच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मध्य प्रदेशमधील सरकार जातंय, राजस्थानमधील सरकार जातंय, छत्तीसगडमधलं सरकारही जातंय.” परंतु, काहीच क्षणात राहुल गांधींना त्यांची चूक लक्षात आली आणि ते म्हणाले, “मी उलट बोललो. तुम्ही मला गोंधळात टाकलं होतं.”
0 Comments