सिमेंटचा बल्कर शाळेसह बस स्टॉपवर धडकला, शाळकरी मुलीसह चौघे चेंगरून जागीच ठार


अक्कलकोट |

 सोलापूर काशीलिंग जेऊर रस्त्यावरील दक्षिण सोलापूर तालुक्याच्या औज (आहेरवाडी) गावातील मुख्य रस्त्याच्या वळणावर सिमेंट वाहतूक करणारा बल्कर अचानक पलटी झाला. त्यावेळी ही गाडी जिल्हा परिषद शाळेच्या गेटला पहिल्यांदा धडकली. त्यानंतर जवळच्याच बस स्टॉपवर जावून आदळली. या भीषण अपघातात बल्करखाली चेंगरून औज (आहेरवाडी) गावातील चौघांचा मृत्यू झाला. 

गावातील विठोबा कोडिया शिंगाडे (वय वर्षे ६५) याच गावातील शालेय विद्यार्थीनी प्रज्ञा बसवराज दोडतले (वय वर्षे ९, इयत्ता- तिसरी), मूळचे कर्जाळचे व सोलापूरस्थित महेश शशिकांत इंगळे (वय वर्षे १७, रा. नई जिंदगी) व अनिल नामदेव चौधरी ( वय वर्षे ५०, रा. दहिटणे ता. अक्कलकोट) हे चौघे जागीच ठार झाले तर यात काजल शिलेप्पा माशाळे (वय वर्षे २ औज) व इरव्वा रावसाहेब बनसोडे (वय ५५, रा. बन्हाणपूर) हे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. शाळेच्या कमानीच्या बाजूस असलेल्या बस स्टॉप येथे परगावी जाण्यासाठी लोक बसले होते. सिमेंट कारखान्यांच्या दिशेकडून कच्चे सिमेंट भरून बल्कर (एम. एच. ०४ एल ई ३०५३) ही गाड़ी सोलापूरच्या दिशेने चालली होती. बल्करचा चालक विलास डोंबाळे (रा. लातूर) हा गाडी चालवत होता. बसस्टॉपजवळ आल्यानंतर त्याचा गाडीवरचा ताबा सुटला, गाडी वेगात होती. या कमानीला धडकून बल्कर पलटी झाला. 

त्याचवेळी शाळेतून बाहेर पडत असताना शाळेचे लोखंडी गेट मुलीच्या अंगावर पडल्याने प्रज्ञा बसवराज दोडतले ही मुलगी जागेवरच मरण पावली तर तिच्यासोबत खेळणारी दुसरी शाळकरी मुलगी काजल शिलप्पा माशाळे ही गंभीर जखमी झाली. पुढे ही गाड़ी बस स्टॉपवर जावून आदळली. त्यावेळी महेश शशिकांत इंगळे, अनिल नामदेव चौधरी, विठोबा शिंगाडे या तिघाच्या अंगावरून ही गाडी गेल्याने तेही जागीच ठार झाले. मयताच्या वारसाना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळावे व त्यांच्या घरातीत एकाला त्याच्या फॅक्टरीमध्ये कामास घ्यावे व सर्व सिमेंट फॅक्टरीच्या गाड्या ये-जा करण्यासाठी गावातून न येता बाहेरून जावे, या मागण्यासाठी औज गावातील संतप्त नागरिकांनी जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यांचे मृतदेह भर उन्हात रस्त्यावर ठेवून सायंकाळपर्यंत ग्रामस्थांनी आंदोलन केले. केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये वारसदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच आंदोलन मागे घेतले. गाड़ी पलटी झाल्यानंतर चालक डोंबाळे हा जखमी झाला. पण ग्रामस्थानी भावनेच्या भरात त्याला ताब्यात घेतले व बेदम मारहाण केली.

 जखमी अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गाडीत ३५ टन सिमेंट होते. रस्त्याच्या जवळच स्टॉप आणि शाळा आहे. या रस्त्यावरून जड वाहतूक केली जावू नये, अशी ग्रामस्थाची अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे. या अगोदरही याच ठिकाणी अपघात होवून एक-दोन लोकांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थाच्या आंदोलनामुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले होते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी सुषार ठोंबरे यांनी आपल्या यंत्रणेला तत्काळ घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची सूचना केली.

Post a Comment

0 Comments