मुंबई |
जे मुख्यमंत्री सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेलेत, अडीच वर्षात सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, अशा बोचऱ्या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
कल्याणमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मोफत बसेस सोडण्यात आल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, संभाजीनगर मध्ये कॅबिनेट झाली या कॅबिनेटमध्ये 60000 कोटींचे पॅकेज मराठवाड्याला दिलेलं आहे. अनेक प्रलंबित विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतले आहेत. मागील सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं.. साडेबारा हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम केलं असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. सरकारकडून फक्त पोस्टरबाजी सुरू असल्याची जे टीका करतात त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्वतः जाऊन लोकांशी भेटा असेही शिंदे यांनी म्हटले. आतापर्यंत लोकांना भेटला नाहीत आता तरी भेटा, तेव्हाच दोन सरकारमधील फरक तुम्हाला कळेल असा टोलाही त्यांनी लगावला.
0 Comments