भगवंत सेना दलामुळे टळले नुकसान! अन्यथा योजनेपासून वंचित राहिले असते अनेक शेतकरी!


बार्शी  - अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या भगवंत सेना दलाचे कार्य खरोखरच समाज उपयोगी ठरत आहे. जनहिताय जनरक्षणाय या ब्रीदवाक्याला साजेल असे कार्य या दलाचे सुरू आहे. संकट कोणतेही असो या दलाचे सदस्य धावत जाऊन गरजवंताची मदत करीत आहेत. सोमवारी या दलातील एका सदस्यामुळे 60 शेतकऱ्याचे नुकसान टळले आहे. एका शासकीय अधिकाऱ्याची गहाळ झालेली फाईल ही दलाचे सदस्य हनुमंत शेळके यांनी मिळवून दिल्याने पशुसंवर्धन विभागाची शासकीय कागदपत्रे मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळलेच पण माणुसकीचे दर्शनही घडून आले. त्यामुळे भगवंत सेना दल एक अनोखा उपक्रम घालून देत आहे.

बघा नेमका तो प्रकार काय आहे..?

 भगवंत सेना दलाचे सदस्य हनुमंत शेळके हे आपल्या मोटरसायकल वरून बार्शीहून बेलगाव येथील आपल्या शेतामध्ये जात असताना, बार्शी - ताडसौंदणे रस्त्यावर सुखदेव नगरच्या पुढील बाजूस रस्त्यावरती लाल रंगाची कॅरीबॅग पडलेली असून त्यामधून काही कागदपत्रे बाहेर आलेली दिसली. हनुमंत शेळके यांनी आपली दुचाकी थांबवून सदरील कॅरीबॅग उचलून त्यातील कागदपत्रे बघितली असता, सदरील कागदपत्रे ही भूम तालुक्यातील शेतकऱ्यांची पशुसंवर्धन विभागाची शासकीय कागदपत्रे असल्याचे दिसून आले. हनुमंत शेळके यांनी लागलीच भगवंत सेना दलाचे प्रमुख धीरज शेळके यांच्याशी संपर्क साधून सदरील हकीकत सांगितली. यावेळी धीरज शेळके यांनी तात्काळ भूम तालुक्यातील मौजे देवळाली येथील रहिवासी असलेले मित्र पत्रकार राजेश खराडे यांना फोनवर संपर्क करून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून संपर्क साधण्यासाठी सांगितले. राजेश खराडे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर रामचंद्र खताळ यांच्याशी संपर्क करून, घडलेला प्रकार सांगितला.

 भूम तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर रामचंद्र खताळ यांच्याशी संपर्क साधला असता, ते बार्शी वरून माणकेश्वर ला जात असताना, त्यांच्या दुचाकीला अडकवलेली कॅरीबॅग ओझ्यामुळे तुटून पडल्याचे सांगण्यात आले. त्या सापडलेल्या कॅरीबॅगमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीने, शेतकऱ्यांच्या शेतावर जनावरांसाठी वैरण उत्पादन करण्यासाठी, शासनाच्या वतीने प्रोत्साहन पर 100% अनुदान अंतर्गत पशुधनचाऱ्यासाठी वैरण बियाणे वाटप योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील 60 शेतकऱ्यांचे फॉर्म व त्यांची शासकीय कार्यालयाच्या पशुधन पर्यवेक्षक माणकेश्वर तालुका भूम यांच्या सही शिक्क्यानिशी व शिक्क्यासह कागदपत्रे असल्याचे निष्पन्न झाले.

 यामध्ये भूम तालुक्यातील माणकेश्वर विभागातील जवळपास सहा ते सात गावातील सुमारे 60 शेतकऱ्यांच्या अर्जासह कागदपत्रांच्या फाईल असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांसाठी चालू असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या योजनेची अर्ज दाखल करण्याची उद्या मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 ही शेवटची तारीख असून, भगवंत सेना दलाच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे व प्रामाणिकपणामुळे भूम तालुक्यातील 60 शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे.

 पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक डॉ रामचंद्र खताळ यांना बार्शी येथे बोलावून घेऊन, सर्व कागदपत्रे, शिक्के व इतर साहित्यासह संपूर्ण कॅरीबॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी डॉक्टर खताळ यांनी, भगवंत सेना दलाच्या तत्परतेमुळे, अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले असून, शेतकऱ्यांच्या वतीने व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भगवंत सेना दलाचे आभार मानले.

 याप्रसंगी भगवंत सेनादलाचे प्रमुख धीरज शेळके, सदस्य अक्षय बारंगुळे, हनुमंत शेळके, राजेश खराडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments