बार्शी | अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो ट्वीट केल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल



बार्शी |

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कलम २३, ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम ७४ आणि IPC 228 A नुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण असे की, बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली.

मात्र या संदर्भात ट्वीट करताना संजय राऊत यांनी आरोपी मोकाट असल्याचं सांगितलं. तसेच पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील ट्वीट केला होता. यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरुन काल रविवारी (19 मार्च) रात्री अकरा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान संजय राऊत यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आधी 41 ब प्रमाणे नोटीस दिली जाईल. राऊत यांना थेट अटक होणार नाही. त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती आहे.

Post a Comment

0 Comments