पंढरपूर |
गुरुवारी दहावीचा पहिला मराठी विषयाचा पेपर होता. पेहे ता.पंढरपूर येथील पेहे माध्यमिक विद्यालय पेहेची विद्यार्थिनी राधा नागनाथ आवटे वय वर्ष १६ रा. बादलकोट, ही दहावीचा पेपर देऊन मोठ्या भावासोबत बहिणीच्या गावाला भाच्याला भेटण्यासाठी ढेकळेवाडी येथे जात असताना पेटलेले झाड अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. राधा ही विद्यार्थीनी पेहे येथून परीक्षा केंद्रावरून करकंब -बार्डी रोड वरून जाताना रस्त्याच्या कडेला दोन दिवसांपासून लिंबाचे झाड पेटत होते. त्याचा बुंधा अर्धवट अवस्थेत पेटला होता. ते जळालेले झाड अंगावर पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मोठा भाऊ संदीप आवटे याला किरकोळ जखम झाली, ही घटना २ मार्च रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. ट्रॅक्टर खाली सापडल्याने मृत्यूः दुसऱ्या घटनेमध्ये अक्षरा देविदास जमदाडे.(वय१३) राहणार भोसे तालुका पंढरपूर ही तिच्या भावासोबत शाळेतून घरी जात असताना, भोसे पाटी येथे अपघात झाला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अक्षरा हे आपल्या भावासोबत भोसे येथील गुरुकुल विद्यालयांमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत होती. शिकवणीचा वर्ग सुटल्यानंतर घराकडे परतत असतानाच भुसे पाटील येथे आल्यानंतर तेथे उभे असलेल्या एका वाहनाने अचानक दरवाजा उघडला व त्यामध्ये दुचाकी वर बसलेली अक्षरा हे रस्त्यावरती पडली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऊस वाहतूकच्या ट्रॅक्टर खाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तरअक्षराच्या पश्चात आई - वडील, भाऊ असा परिवार आहे.
घटनेची नोंद पंढरपूर पोलीस स्टेशन येथे झाली. राधाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. इयत्ता दहावी मध्ये शिकणारी राधा ही हुशार आणि मन मिळवून स्वभाव होती. राधाचे आई-वडील हे मोल मजुरी करून आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. राधाला चार बहिणी व एक भाऊ आई-वडील असा परिवार आहे. राधा घरातील सर्वात लहान होती. दहावीची परीक्षा देऊन पुढे अकरावी व बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्याचे राधाचे स्वप्न होते. पण या अपघाता मध्येच राधाचा मृत्यू झाल्याने तिचे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. रात्री आठ वाजता करकम ग्रामीण रुग्णालय येथून सेवाविच्छेदन करून आणल्यानंतर बादलकोट येथे तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन अपघातामध्ये मुलींचा मृत्यू झाल्याने भोसे, बादलकोट दोन्ही गावावरती शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही विद्यार्थिनीवर शोकाकुल वातावरणात सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments