व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून वरकुटे येथे एकाची तणनाशक प्राशन करून आत्महत्या...


करमाळा |

करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथे खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून नसीर इलाही पठाण (वय ५५) या शेतकऱ्याने सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी तणनाशक औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी कुर्डुवाडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असताना गुरूवार दि. २३ फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत मयताचा मुलगा अझरूद्दीन नसीर पठाण याने करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आमच्या गावातील अंकुश केरबा हांडे यांनी आमच्या वडिलांना एकूण ३ लाख रुपये व्याजाने दिले होते. त्याच्या बदल्यात आमच्या वडिलोपार्जित शेतीमधील ९६ आर शेती त्याच्या पत्नीच्या नावे लिहून घेतली होती. या रकमेच्या व्याजाच्या पैशासाठी अंकुश हांडे आणि त्यांची दोन मुले महादेव आणि सुंदर हे वारंवार तगादा लावून माझे वडील नसीर यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून अपमानित करत होते.

 दि. २०-०२-२०२३ रोजी दुपारी ०१.३० च्या दरम्यान प्रवीण खोचरे (रा. कन्हेरगाव, ता. माढा), विजय ढोबळे, सागर ढोबळे, बाळासाहेब ढोबळे (सर्व रा. भोगेवाडी, ता. माढा) असे सर्वजण एकत्र येऊन माझ्या आईसमोर वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून 'तू येथून निघून जा... आम्ही तुला जिवंत सोडणार नाही...' अशी धमकी दिली. या लोकांच्या त्रासाला कंटाळून माझ्या वडिलांनी तणनाशक प्रश्न करून आत्महत्या केली आहे.  या प्रकरणी करमाळा पोलिसांत अंकुश केरबा हांडे, सुंदर अंकुश हांडे, महादेव अंकुश हांडे, प्रवीण भारत खोचरे, विजय ढोबळे, सागर ढोबळे, बाळासाहेब ढोबळे यांच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम ३०६, ५०४, ५०६, ३४, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३९, ४५, ४६ नुसार गुन्हा नोंद झाला असून  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments