देशमुख प्लॉट रहिवासी यांचे मानवी हक्कांसाठी धरणे आंदोलन सत्याग्रह


बार्शी |

देशमुख प्लॉट, मल्लिकार्जुन मंदिर बार्शी येथील रहिवासींचे मूलभूत आणि मानवी हक्क अधिकारात असलेल्या समस्यांसाठी मानवी हक्क दिवसाच्या आदल्या दिवशीच बार्शी नगरपरिषद बाहेर जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, बार्शी च्या माध्यमातून देशमुख प्लॉटच्या रहिवासी यांनी 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजता 'रहिवाशी धरणे आंदोलन सत्याग्रह' केला.

सविस्तर बातमी अशी की, 32 वर्षापासून देशमुख प्लॉट, मल्लिकार्जुन मंदिर बार्शी या रहिवासी भागकडे लोकप्रतनिधी व बार्शी नगरपरिषद प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे हा भाग नेहमीच मूलभूत अधिकार व मानवी हक्का पासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेला आहे. या दुर्लक्षित रहिवासी भागाला रस्ते, गटारी, आरोग्यदायी व निरोगी वातावरण तसेच  सन्मानाने जीवन जगण्यासाठी मुलभूत सुविधा देण्यासाठी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे मनीष देशपांडे यांच्या मार्फत बार्शी नगरपरिषद, जिल्हाधिकारी सोलापूर, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय सह संबंधित सर्व विभागाला रहिवाशांच्या नाव व सही सह मागील 4 महिन्या पासून तक्रार व पत्रव्यवहार करण्यात आले होते. परंतु मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद सह सर्व प्रशासन  विभागांनी याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे येथील रहिवासी लोकांनी शेवटी धरणे आंदोलन सत्याग्रह करण्याचा पर्याय स्वीकारला.

आंदोलनाच्या मागण्या...

आंदोलना मध्ये 32 वर्षापासून तयार न झालेला किशोर पतंगे ते रियाज मोमीन घरापर्यंत चा रस्ता व जुम्मा मस्जिद ते लक्ष्मी आई माता मंदिर या दरम्यान चा रस्ता तसेच या भागांमध्ये असलेला छोटा पुला ऐवजी मोठा व मजबूत पूल तात्काळ तयार करून मिळावे, मानवी जीवाला धोका असणाऱ्या अंग्लो उर्दू हायस्कूल ते छत्रपती संभाजी सभागृह दरम्यान वाहत्या ओढ्यावर तसेच मलिकार्जुन मंदिर ते छत्रपती संभाजी सभागृह दरम्यान वाहत्या नाल्यावर मजबूत आरसीसी बांधकाम करून त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण स्लॅब टाकावा आणि या ओढ्यातील व नाल्यातील गेल्या पाच वर्षांमध्ये वाढलेली झाडे, झुडपे, गवत तत्काळ तोडून टाकावेत, या रहिवासी भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याचे नियोजन करावे, या रहिवासी भागातील दुर्गंध असलेले सर्व सार्वजनिक शौचालय तात्काळ हटविण्यात यावे, हा रहिवासी परिसर हागणदारीमुक्त व दुर्गंध मुक्त करावा, या रहिवासी भागात दररोज नियमित शुद्ध व निर्जंतुक पिण्याचा पाणीपुरवठा करावा या मागण्या केल्या गेल्या होत्या.

मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद यांनी दिलेले लेखी आश्वासन

यावर मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद बार्शी यांनी 32 वर्षापासून तयार न झालेले रस्ते तसेच मानवी जीवाला धोका असणाऱ्या ओढ्यावर व नाल्यावर मजबूत आरसीसी बांधकाम करून त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण व मजबूत पूल बांधणे यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेऊन वित्तीय तरतुदीप्रमाणे कामे हाती घेण्यात येतील सदरचे काम साधारण आठ ते नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, रहिवासी लोकांनी केलेल्या मागणीप्रमाणे ओढ्यातील व नाल्यातील वाढलेली झाडे झुडपे, गवत काढून घेण्यात येतील, भविष्यकाळात या रहिवासी भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याचे नियोजन आठ ते नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल,  प्रशासकीय ठरावानुसार सार्वजनिक शौचालय पाडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, हा सर्व रहिवासी परिसर हागणदारी मुक्त व दुर्गंध मुक्त करण्यासाठी कार्यवाही करीत आहोत, या रहिवासी भागात दररोज नियमित शुद्ध व  निर्जंतुक पिण्याचा पाणीपुरवठा एक दिवसाढ निश्चित वेळेला केला जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच हे सुरू असलेले सत्याग्रह धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.

रहिवाशी यांचा अभिप्राय

32 वर्षापासून हा भाग रस्ते,गटार, नाले, आरोग्य या मूलभूत अधिकारापासून खूपच दूर आहे. तो जर लेखी आश्वासनानुसार करण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयाच्या बाहेर आम्ही सर्व रहिवासी धरणे आंदोलन करू.  -  सुमन जाधव, रहिवासी, देशमुख प्लॉट मल्लिकार्जुन मंदिर, बार्शी.

Post a Comment

0 Comments