बोगस शाळा तपासणी अधिकारी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर |

नांदेड येथील जिल्हा परिषदेत शाळा तपासणी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विद्यासागर सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जाकिरा फिरदोस गफार शेख व शाहीद अल्लू खान (दोघे रा. क विभाग विडी घरकूल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 एका गुन्ह्यामध्ये साक्षीदार म्हणून जाहिरा व शाहीद हे दोघे कार (एमएच 13डीई 1632) मध्ये बसून विडी 'घरकूल पोलीस चौकीत आले होते, त्यावेळी त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी होती. तेव्हा शाहीद खान यांनी जाकिरा या जिल्हा परिषद सोलापूरच्या आस्थापनेवर शाळा चेक करण्याचे काम करतात असे सांगितले. तेव्हा सोनकांबळे यांना संशय आला. त्या महिलेकडे त्यांनी अधिक तपास केला असता त्यांच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नांदेड जिल्हा परिषद यांच्या नावे आयडेंटी कार्ड मिळाले व त्यावर जाकिरा शेख यांचे छायाचित्र व नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सही होती. त्यांची नांदेड येथे चौकशी केली असता नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत त्या कार्यरत नसल्याचे व त्यांच्या जवळ बनावट ओळखपत्र असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments