चिखर्डेतील 10 वर्षीय दिव्यांग मुलाच्या पार्थिवावर तब्बल 28 तासांनी अंत्यसंस्कार


बार्शी |

बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे ग्रामपंचायतकडून दिव्यांगाना देण्यात येणारा निधी मिळत नसल्याने 15 नोव्हेंबरपासून स्मशानभूमीमध्ये उपोषण सुरू असताना अल्पवयीन दिव्यांग मुलगा संभव (वय 10) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बार्शी तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले असून तीन सदस्यीय समितीद्वारे एक महिन्यात चौकशी पूर्ण करून संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कुरुळे कुटुंबियांनी तब्बल 28 तासानंतर दिव्यांग मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

उपोषण सुरु असताना दिव्यांग संभव रामचंद्र कुरुळे (वय 10) याचा रविवारी दुपारी चारच्या दरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मुलाचे वडील रामचंद्र कुरुळे व उपोषणकर्ते यांनी घेतली होती. दरम्यान सोमवारी सकाळी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजिवनी बारंगुळे यांनी कुरुळे कुटुंबांच्या घरासमोर प्रशासन चर्चा करीत असतानाच पोलिसांसमोरच डिझेलची बाटली अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखले.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रविवारी दुपारी चारनंतर कुरुळे कुटुंबाच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनिल शेरखाने, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैराग, पांगरी, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments