सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडणार! राजन पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित..??



मोहोळ/प्रतिनिधी:

 जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसणार आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांचे दोन्ही चिरंजीवांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी स्वतः दुजोरा दिला असल्याने जेव्हा हा प्रवेश होईल तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.

सध्या जिल्हाध्यक्ष काका साठे हे द्विधा मनस्थितीत दिसत आहेत. राजन पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांनाही थेट सांगून टाकले आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा उत्तर तालुक्याला जोडला गेला आहे. त्या मतदारसंघात उत्तरची तब्बल 24 गावे असल्याने काकांचे टेन्शन वाढले आहे. राजन पाटलांनी काका साठे यांना ही भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. आजपर्यंत दोघांनी मिळून सलग तीन वेळा मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला आहे.

एकमेकांच्या समन्वयाने हे यश मिळाले असे काका सांगतात. आता तेच पक्षात नसतील तर मला अवघड जाणार आहे. उमेश पाटलांना घेऊन काम करता येणार नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. ते कदापि शक्य नाही. त्यांच्यामुळे तर हे सर्व घडत असल्याचा आरोप काका साठे यांनी केला.

इडीची कारवाई नको म्हणून आणि आमदारकी यासाठी राजन मालक जात आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला असता अजिबात नाही. पक्षाचे त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष, उमेश पाटलांना कुणी थांबवेना, मी किती वेळा पक्षाच्या निदर्शनास आणून दिले त्याचा काही फायदा झाला नाही. असा नाराजीचा सूर काकांच्या तोंडून आला.

मी सध्या विचार करत आहे काय करावे, अडचणीत सापडलो आहे. असे ते म्हणताच तुम्ही ही भाजपात जाणार का? या प्रश्नावर नाही बाबा, मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असे सांगून काकांनी सर्व चित्र स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments