जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाच हाती आलेल्या जसप्रीत बुमराहने बॅटच्या साह्याने अनोखा विश्वविक्रम नावावर केला. स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये बुमराहने तब्बल 35 धावा कुटल्या. यापैकी बुमराहच्या बॅटमधून 29 धावा निघाल्या तर बाकी अवांतरच्या होत्या.
2007 साली झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्याच गोलंदाजीवर सहा षटकार खेचत विक्रम केला होता. भारतीय फलंदाजांकडून धुलाई होण्याची ब्रॉडची ही दुसरी वेळ आहे.
याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम ब्रायन लारा, जॉर्ज बेली आणि केशव महाराज यांच्या नावावर संयुक्तपणे होता. आता हा विक्रम बुमराहच्या नावावर असेल.
ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अफलातून शतकी खेळींसमोर निष्प्रभ ठरलेल्या इंग्लंडल्च्या गोलंदाजांनी बुमराहसमोर शरणागती पत्करली. अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडची लय पूर्णत: भरकटली आणि त्याला बुमराहच्या बॅटचा तडाखा सहन करावा लागला.
पहिल्या चेंडूवर बुमराहने ब्रॉडचा उसळता चेंडू हुक करून चौकार वसूल केला. दुसरा चेंडू वाईड होता आणि इंग्लंडचा विकेटकीपर सॅम बिलिंग्जला पार करून चौकार गेला. पाच धावा मिळाल्या. तिसरा चेंडू नोबॉल ठरला आणि बुमराहने त्यावर खणखणीत षटकार लगावला. पुढच्या तीन चेंडूंवर बुमराहने तीन आक्रमक चौकार खेचले.
यानंतरच्या चेंडूवर बुमराहने उत्तुंग षटकार खेचत विश्वविक्रम नावावर केला. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट आणि उभं राहून अभिनंदन केलं. शेवटच्या चेंडूवर बुमराहने एक धाव घेतली.
बुमराहने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 31 धावांची खेळी केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजांचा निर्णय घेतला. भारतीय संघाची 98/5 अशी अवस्था झाली. यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी 222 धावांची वेगवान भागीदारी केली.
पंतने 19 चौकार आणि 4 षटकारांसह 146 धावांची मॅरेथॉन खेळी केली. रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी 13 चौकारांसह 104 धावांची खेळी केली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 4 टेस्ट झाल्या. कोरोनामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. भारतीय संघ या मालिकेत 2-1 आघाडीवर आहे.
0 Comments