बार्शी शहर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन



बार्शी/ प्रतिनिधी:

 महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती व वातावरण पाहता, बार्शी शहर व तालुक्यात कोणतीही सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होवू नये याची काळजी व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने बार्शी शहर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीत बोलताना आ. राजेंद्र राऊत यांनी ग्वाही दिली की, बार्शी शहर व तालुका हा अठरा पगड जातीचे व सर्व धर्मांचे सण-उत्सव एकत्रितपणे आनंदाने साजरा करणारा असून, बार्शी शहर हे अनेक परंपरा व विचारांची शिदोरी घेऊन गुण्या-गोविंदाने नांदणारे आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची मला खात्री आहे. येथील सर्व राजकीय पक्ष, संघटना व सर्वधर्मिय उत्सवप्रिय मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे अनेक वर्षांपासून बार्शीची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत सोशल मिडियावर ( फेसबुक, व्हाटस्अप, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी )  सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणारे लिखाण व फोटो ( पोस्ट ) प्रसारित करणारे काही समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व त्यांच्यावर अंकुश ठेवावा. जेणेकरून खोट्या बातम्या पसरवून बार्शी शहर व तालुक्याची शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे मतही व्यक्त केले.

या बैठकीस माजी मंत्री दिलीप सोपल, शांतता कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.जालिंदर नालकूल, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, शांतता कमिटीचे सदस्य, विविध पक्षांचे, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments