महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावर लवकरच योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीअंतर्गत मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामधून अधिस्विकृतीधारक पत्रकारांना गंभीर आजार,अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवारांकडुन आज पत्रकारांच्या विविध समस्या,प्रश्नांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजनेंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकार आणि त्याची पत्नी, पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे.आजपर्यंत या योजनेंतर्गत २५८ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना एकूण १ कोटी ५८ लाख ५२ हजार ७११ एवढी रक्कम वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पत्रकारांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी आणि पिवळे रेशनकार्डधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता त्याअंतर्गत आजपर्यंत २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावरही योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
0 Comments