विश्वास बारबोले प्रवेशाची अधिकृत घोषणा नाहीच? ; जयंत पाटलांनी बोरबोले यांच्या घरी दुपारी घेतले स्नेहभोजन


बार्शी : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता, आज त्यांनी बार्शीत दुपारचे जेवण केले. बार्शीतील राजकीय नेते आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या कासारवाडी रोडवरील घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे बारबोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. तालुक्यात याचीच चर्चा रंगली आहे. मात्र, अद्याप वेट अँड वॉच असेच दिसून येते.

#माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. महाद्वार चौकातील त्यांच्या कार्यालयासमोर मांडव टाकून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या. भेटीसाठी येणारे मित्र, कार्यकर्ता आणि नागरिकांचा सत्कार स्वीकारून एकप्रकारे कृष्णराज बारबोले यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच, सोलापूर दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बारबोले कुटुंबियांची भेट घेत कोठ्यावर दुपारचे जेवण केले. 

यावेळी, बारबोले कुटुंबीयांनी त्यांचं स्वागत केलं. पिठलं आणि भाकरी खाऊन हे नातं आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न या भेटीतून झाला आहे. मात्र, बारबोले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत कुठलीही घोषणा आजच्या दौऱ्यात झाली नाही. त्यामुळे, बारबोले यांच्या प्रवेशाच्या चर्चेला अद्याप स्वल्पविरामच आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळातील अनेकांच्या डोक्यात टिकटिक वाजत आहे. 

Post a Comment

0 Comments