नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सोयगाव नगरपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपला धक्का दिला. त्यानंतर भाजपचे सदस्य फोडून भाजपला दुसरा धक्का दिला. त्यानतंर आता शिवसेना पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण तसे संकेतच राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
शिवसेनेच्या शिवतेज अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसलं. मतदारसंघातून भाजपचा लवकरच सुपडासाफ होईल. भाजपचे पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांना आणखी एक धक्का देणार असल्याचं दिसत आहे.
भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात आहेत. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आपल्या मतदारसंघातील कमळाबाईचा बंदोबस्त करणार असंही त्यांनी म्हटलं आहे.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. पण, आज पुन्हा एकदा सत्तार यांनी दानवेंना आणखी एक तडाखा दिला आहे. सत्तार यांनी भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सेनेत खेचून आणले आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवला. 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने बहुमत मिळवून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राजकीय डावपेच आखून भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेकडे वळविले. या 4 जणांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश झाला आहे.
सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या दानवेंना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 11 जागांवर विजय मिळाला आहे. आता शिवसेनेत भाजपचे नवविर्वाचित सदस्य दाखल झाल्यामुळे दानवेंची मोठी नाचक्की झाली आहे.
0 Comments