खोटे लग्न ! लाखो रुपये उकळून नववधूने ठोकली सिनेस्टाईल धूम


सांगली/प्रतिनिधी:

लग्नासाठी नवरदेवाकडून दोन लाखांच्या रोकडसह 3 लाखांचा मुद्देमाल उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सिनेस्टाईल नववधूने धूम ठोकत फसवणूक झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कराडच्या नवरदेवाने विटा पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 नवरदेवाला लग्नासाठी मुलीच्या नातेवाईकांना हुंडा द्यायचा. कदाचित यावर आपला विश्वास बसणार नाही. पण असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. लग्न लावायचं पैसे उकळायचे आणि दुसऱ्या दिवशी नवरी गायब असे प्रकार वाढत आहेत. अगदी सिनेस्टाईल पद्धतीने हे सर्व प्रकार होताना पहायला मिळत आहेत.

असाच एक प्रकार विटा याठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. गणेश बबन कुंभार (रा. कराड) येथील नवरदेवाची फसवणूक झाली आहे. खोटे लग्न लावून त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने उकळून नवरीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पीडित नवरदेवाने विटा पोलीस ठाणे गाठत "स्वाती" नामक नववधूसह तिच्या कथित पाच नातेवाईकांच्या विरोधात खोटे लग्न लावून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये राहणारा गणेश कुंभार (वय 41) याचा 28 डिसेंबर 2021 रोजी स्वाती नामक तरुणीशी विवाह संपन्न झाला होता. खानापूरच्या सुलतानगादे येथील वर्षा जाधव यांच्या घरी ही 'यादी पे शादी" मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडली होती. या लग्नासाठी गणेश कुंभारकडून रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने, साडेतीन भाराचे चांदीचे दागिने लग्नाच्या वेळी घेण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments