अभिनेत्री रिंकू राजगुरूनं केवळ मराठीत नाही तर हिंदीतही आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. पण असं असलं तरी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट' सिनेमातील तिनं साकारलेली आर्ची मात्र आजही डोळ्यासमोरनं जात नाही. वयाच्या पंधराव्या वर्षात कोणत्याही ट्रेनिंगशिवाय तिनं साकारलेली भूमिका काही केल्या तिच्या चाहत्यांच्या मनातून पुसली जात नाही. म्हणूनच तर ती आजही आर्ची नावाने जास्त ओळखली जाते. तिच्यात असलेल्या सहज अभिनयगुणानं तिला यशाचे अनेक टप्पे पार पाडायला मदत केली.
तिनं स्वतःमध्ये एका अभिनेत्रीसाठी आवश्यक असे सगळे बदल घडवून आणले. तेव्हाची रिंकू अन् आताची यात जमिन-आस्मानाचा फरक. आजपर्यंत आपण तिच्या सिनेमांच्या बातम्या वचाल्या असतील,तिच्या फिटनेस विषयी,तिच्यातील बदलाविषयी,तिच्या फॅशन आवडींविषयी वाचलं असेल पण आता बातमी आहे ती तिच्या अफेअरच्या चर्चांविषयी. काय घडलं असं नेमकं की रिंकू राजगुरू कोणाला तरी डेट करतेय अशा चर्चेला उधाण आलं.
रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या सिनेमांविषयी,फॅशन फोटोशूट विषयी पोस्ट करीत असते. तिचे चाहतेही तिच्या अशा पोस्टच्या प्रतिक्षेत असतातच. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. ज्यात ती तिच्या डिनर डेटविषयी बोलत आहे. या डिनर डेटला तिच्यासोबत एक अभिनेताही दिसत आहे. दोघेही खूश दिसतायत आणि दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या डिनर डेटची पोस्ट शेअर केली आहे. कोण आहे तो अभिनेता?ज्याला रिंकू डेट करीत आहे.
तर रिंकू सोबत डिनर डेटला गेला होता तिचा परश्या. हो,म्हणजेच सैराट सिनेमातला आकाश ठोसर. जो तिचा खूप चांगला मित्र आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे डिनर डेटला गेले होते. तेव्हाचे फोटो दोघांनी पोस्ट केले आहेत. आकाशने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की,”खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार”. तसेच रिंकू राजगुरूने तिचा गाडीतला व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की,”लवकरच पुन्हा भेटू”.
त्यांचे डिनर डेटचे फोटो पाहून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे. चाहत्यांनी खूप छान जोडी म्हणत कमेंट्स केल्या आहेत. पण या दोघांनी मात्र यावर शांत राहणं पसंत केलं आहे. रिंकू राजगुरू सैराटनंतर ‘मेकअप’,’कागर’ या मराठी सिनेमात तर ‘१००’,’अनपॉज्ड’,’२०० हल्ला हो’ या वेबसिरीजमध्ये झळकली आहे.
त्यानंतर आता ती ‘छुमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. तर आकाश ठोसर ‘एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या सिनेमात झळकला आहे. तसेच तो ‘लस्ट स्टोरीज’,’१९६२ द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमध्ये दिसला आहे. यानंतर आता तो ‘घर’,’बंदूक बिर्यानी’ या सिनेमातही दिसणार आहे.
0 Comments