कोल्हापूर : माणदेशासारख्या वैराण प्रदेशातून येत, शिवाजी विद्यापीठात बळ घेवून आपल्या असतेपणाच्या खुणा, जाणिवा 'जिभाळी' या काव्यसंग्रहातून कवीने व्यक्त केल्या आहेत. कविता ही वेदनेशी जोडलेली असते. ग्रामीण भागातील तरुणांच्या वेदणांचे, भावनांचे आंतरिकीकरण कवीने या काव्यसंग्रहातून मांडले आहे. अस्वस्थ, संवेदनशिल मनाचा अंतराय काव्यसंग्रहातून अधोरेखित होतो. असे मत मराठी साहित्याचे समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचा विद्यार्थी अमितकुमार पवार यांच्या 'जिभाळी' या कविता संग्रहाच्या प्रकाशना प्रसंगी ते बोलत होते.
आटपाडी येथुन शिक्षण घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठात आलेल्या अमितकुमार यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. याच कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा सदिच्छा हॉल, बागल चौक येथे पार पडला. गाव खेड्या पासून ते शहरी जीवनापर्यंत तसेच आई - वडीलांच्या माये पासून मैत्रीपर्यंतचा भाव या कविता संग्रहात मांडला आहे.
कवी अमितकुमार यांनी विद्यापीठातील हॉस्टेलच्या वास्तव्यात या कवितांना मूर्तरूप दिल्याचे सांगितले. कवितांच्या प्रवास पुस्तक रुपाने पुढे येण्यात शिक्षकांसह सर्व मित्र परिवाराने वेळोवेळी मदत व प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. निशा मुडे - पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रा.डॉ. शिवाजी जाधव होते. यावेळी विद्यापीठातील अमितकुमार यांचा मित्र परिवार, कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय जहागिरदार यांनी केले. तर आभार महेश माने यांनी मानले.
0 Comments