बार्शी - पंढरपूरहून निझामाबादकडे जाणाऱ्या पहिल्या डेमू लोकल रेल्वेचे ०१४१४/०१४१३ बार्शी रेल्वे स्थानकावर बुधवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजता आगमन झाले. त्यावेळी, रेल्वे प्रवासी सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे गाडी आणि लोको पायलटचे स्वागत करण्यात आले. प्रवासी सेलचे शैलेश वखारिया आणि इतर पदाधिकारी सकाळी 7.15 वाजताच लोकलच्या स्वागतासाठी स्थानकावर पोहोचले होते.
लोकल रेल्वेला पुष्पहार घातल्यानंतर वखारीया यांनी गुलाबपुष्प देऊन लोको पायलट टी. रमेश व सहायक लोको पायलट विनायक फुले यांचे स्वागत केले. तसेच, डेमु लोकलचे गार्ड बी.जी.डांगे यांचेही स्वागत करण्यात आले. भविष्यात बार्शी स्थानकाहून आणखीन गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणीही रेल्वे प्रवासी सेलतर्फे करण्यात आली.
डेमू लोकल बार्शीकरांसाठी सोयीची असून पंढरपूरला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ 2 तासांचा अवधी लागणार आहे. निझामाबादहून दुपारी 1.25 वाजता ही गाडी निघणार, बार्शीला मध्यरात्री 2.03 वाजता पोहचेल. तर, पंढरपूरहून पहाटे 5.30 वाजता निघून बार्शीला सकाळी 7.15 वाजता पोहचणार आहे. ही गाडी दैनिक असल्याने प्रवाशांना दररोज या गाडीतून प्रवास करता येईल. दरम्यान, लातूर रोड जंक्शनमधे लोकलचे लोको पायलट व गार्ड बदलतील व संपूर्ण लोकलची तपासणी केली जाईल. त्यामुळे, लोकल रेल्वेला लातूर रोड जंक्शनमध्ये मोठा हॉल्ट देण्यात आला आहे.
0 Comments